फुरसुंगी पोलिसांची जलद कारवाई; चोरीचा गुन्हा १२ तासांत उघडकीस!


फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; उरुळी देवाची येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड

दोन विधीसंघर्षित बालकांना घेतले ताब्यात; १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

  • ​न्यू रोखठोक महाराष्ट्र न्यूज…

पुणे: फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौतुकास्पद कामगिरी करत उरुळी देवाची येथील एका मोबाईल शॉपीमध्ये झालेली घरफोडी अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यातील ६२ हजार ७४५ रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जुलै २०२६ च्या रात्री १०:०० ते ५ जुलै २०२६ च्या सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील भाजी मंडईत असलेल्या “एस.एस. मोबाईल शॉपी” चे लोखंडी शटर अज्ञात चोरांनी उचकटून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी दुकानातून १४ मोबाईल फोन, ११ एअर बड्स, ३ मोबाईल वॉच, ५ पॉवर बँक आणि दुरुस्तीसाठी आलेले इतर मोबाईल असा एकूण ६२,७४५/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) सन २०२३ च्या कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २८२/२०२६) दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रसाद कोरडे व विशाल हराळे यांना उरुळी देवाची येथील स्मशानभूमीजवळ दोन संशयास्पद तरुण पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.

​मिळालेल्या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने तपास पथकाने स्मशानभूमी परिसरात गुप्तपणे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पथकाने त्यांना शिताफीने वेढा घालून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांची व त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता, चोरीला गेलेले सर्व मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आढळून आल्या.

​अधिक चौकशीत त्यांनी ‘एस.एस. मोबाईल शॉपी’चे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान हे दोन्ही आरोपी विधीसंघर्षित बालक (नाबालिक) असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

​सदरची धडाकेबाज कामगिरी पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) मा. जीवन बेनिवाल (IPS), लोणी काळभोर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मा. अनुराधा उदमले मॅडम, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. अमोल मोरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, बापुसाहेब खंदारे, स.पो.फौ. हरी कदम, पोलीस हवालदार सतीश काळे, सुनील कांबळे, वैभव भोसले, विभीषण कुंटेवाड, पोलीस अंमलदार प्रसाद कोरडे, विशाल हराळे, सचिन गावडे, योगेश गायकवाड, नितीन सोनवणे, विनायक पोमण आणि गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

​या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हरी कदम करत आहेत.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!