पुणे पोलिसांना आव्हान देणाऱ्या गुन्हेगाराचा गेम ओव्हर; गुन्हे शाखा युनिट ५ आणि खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे ची धडक कारवाई!


पुणे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हे शाखेकडून अटक; तब्बल २५ गुन्हे दाखल

पुणे:

बाणेर पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पसार झालेल्या बिंतुसिंग कल्याणी या सराईत गुन्हेगाराला पुणे शहराच्या गुन्हे शाखा युनिट ५ आणि खंडणी विरोधी पथक-२ च्या संयुक्त पथकाने बोरीऐंदी येथून शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपीला चारही बाजूंनी घेरून जेरबंद केले. या कारवाईत आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

२१ जून २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याचे एक पथक घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा पाठलाग करत हडपसरमधील रामटेकडी भागात आले होते. यावेळी बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी आणि करणसिंग रजपुतसिंग दुधाणी हे दोघे दुचाकीवरून पळून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, बिंतुसिंगने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घातली, तर करणसिंगने धारदार हत्याराने पोलिसांवर हल्ला केला.

या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश रायकर हे जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि स्वसंरक्षणार्थ गणेश रायकर यांनी केलेल्या फायरिंगमध्ये करणसिंग दुधाणी जखमी झाला, मात्र बिंतुसिंग कल्याणी तिथून दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

 

पसार झालेल्या बिंतुसिंगचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ५ आणि खंडणी विरोधी पथक-२ चे समांतर तपास सुरू होता. यादरम्यान पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले आणि शशिकांत नाळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी बिंतुसिंग कल्याणी हा हवेली तालुक्यातील बोरीऐंदी गावाच्या शिवारात लपून बसला असून तो पुणे जिल्हा सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस पथकाने बोरीऐंदी येथील दरेकरवाडी रोडवर सापळा रचला. तिथे आरोपी बिंतुसिंग हा आणखी एका इसमासह रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला, मात्र सतर्क पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला चारही बाजूंनी घेरले आणि ताब्यात घेतले.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे विचारली असता, त्यांनी आपली नावे:

१) बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे)

२) हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३५, रा. सोरताप वाडी, पुणे) अशी सांगितली.

अधिक चौकशी केली असता, बिंतुसिंगने गुन्हा केल्याची संपूर्ण माहिती असतानाही त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी हसपालसिंग कल्याणी आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) या दोघांनाही गुन्ह्यात मदत केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.

 

अटकेत असलेला मुख्य आरोपी बिंतुसिंग कल्याणी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे (चोरी, घरफोडी, हल्ला इत्यादी) तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला मदत करणाऱ्या हसपालसिंग कल्याणी याच्यावरही आधीच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना वानवडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, वानवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

सदरची धडक कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक व शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक अभिजीत पवार, अमलदार शहाजी काळे, शशिकांत नाळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, सुधीर सोनवणे, नासेर देशमुख, परमेश्वर कदम, नेत्रिका अडसुळ आणि खंडणी विरोधी पथक-२ चे नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर आणि पवन भोसले यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!