बनावट समझोता करार करून फसवणूक; हडपसर पोलीस ठाण्यात केदार बिडवाई ,तुषार पायगुडे, रमेश कुलकर्णी,सह साथीदारांवर गुन्हा दाखल!!!
पुणे:
सावकारी आणि फसवणुकीचे खोटे आरोप लावून एका नागरिकाची बदनामी करणे तसेच मालमत्तेच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केदार माधव बिडवाई, गजानन बिडवाई, तुषार सुदाम पायगुडे, विनोद रमेश कुलकर्णी आणि इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना आणि पार्श्वभूमी
तक्रारदार राजेंद्र केशवराव मोकाशी (वय ५९, रा. बाणेर रोड, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने २५ मे २०२२ रोजी हडपसर, माळवाडी येथील शिवनेरी कामधेनु इस्टेटमधील सुमारे २३५ चौ. फूट क्षेत्रफळाचे एक दुकान मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी याच्या नावे १८ लाख रुपयांना रीतसर खरेदी केले होते. हा सर्व व्यवहार बँकेच्या धनादेशाद्वारे आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आला होता.
मे २०२५ मध्ये आरोपी केदार माधव बिडवाई याने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर करून मोकाशी यांनी हे दुकान सावकारी व्यवहारातून बळकावल्याचा आरोप केला. या अर्जासोबत २०२२ मधील एक कथित समझोता करार जोडण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने चौकशी केल्यानंतर या अर्जात कोणतेही तथ्य आढळले नाही आणि तो अर्ज फाईल बंद करण्यात आला.
तक्रारदाराने माहिती अधिकाराखाली (RTI) चौकशीची कागदपत्रे मिळवली असता, आरोपीने सादर केलेला समझोता करार पूर्णपणे बनावट असल्याचे आणि त्यावर मुलाची बनावट स्वाक्षरी असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केलेल्या सखोल चौकशीत पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या:
बनावट स्टॅम्प पेपर: समझोता करारासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर २०२५ मधील होता, मात्र त्यावर २०२२ ही जुनी तारीख दाखवण्यात आली होती.
मूळ दस्तऐवज लपवणे: पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपीने केवळ कराराची झेरॉक्स प्रत सादर केली आणि मूळ करार स्वतःकडेच ठेवून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला.
गुन्हेगारी कट: तक्रारदार व त्यांच्या मुलाची बदनामी व्हावी, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल व्हावा आणि स्वतःचा बेकायदेशीर फायदा व्हावा या उद्देशाने आरोपींनी संगनमताने हा गुन्हेगारी कट रचला.
या प्रकरणी राजेंद्र मोकाशी यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६१, ३३५, ३३६, ३३८, २३८, २४८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









