श्रीगोंदा:जादा परताव्याचे आमिष दाखवून तरुणाची १२ लाखांची फसवणूक; समर्थ क्रॉप केअर च्या ११ जणांवर गुन्हा दाखल!!!!


 

१२ लाखांची फसवणूक; ११ जणांवर गुन्हा दाखल!!!!!

पुणे/श्रीगोंदा: ‘सिस पे’ घोटाळ्यानंतर आता ‘समर्थ क्रॉप केअर’ या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका तरुण शेतकऱ्याची १२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घोटाळ्यात हजारो गुंतवणूकदार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकी घटना काय?

विक्रांत प्रशांत जाधव (वय २६, रा. श्रीगोंदा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल-मे २०२५ दरम्यान सोशल मीडियावर ‘समर्थ क्रॉप केअर’ची जाहिरात पाहून जाधव यांनी कंपनीच्या सेमिनारला हजेरी लावली होती. या सेमिनारमध्ये गुंतवणूकदारांना दरमहा १० टक्के परतावा (५ टक्के नफा आणि ५ टक्के मूळ रक्कम) देण्याचे आकर्षक आश्वासन देण्यात आले होते.

पुण्यातील कार्यालयात बोलावून जाधव यांना डिजिटल प्लॅटफॉर्म आणि परताव्याचे सादरीकरण करून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. या आमिषाला बळी पडून जाधव यांनी १९ मे २०२५ रोजी २३ धनादेशांद्वारे एकूण १८ लाख रुपये कंपनीच्या खात्यात जमा केले.

असा झाला खुलासा ; सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून जून ते ऑगस्ट २०२५ या काळात जाधव यांना टप्प्याटप्प्याने ५ लाख ९० हजार रुपये परत करण्यात आले. मात्र, त्यानंतर परतावा देणे अचानक बंद झाले. उरलेले १२ लाख १० हजार रुपये परत न करता संशयितांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले.

 

या प्रकरणी पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

१. प्रशांत अनिल गवळी

२. ज्योती प्रशांत गवळी

३. अमृता प्रकाश सुपेकर

४. नवनाथ दगडू जाधव

५. सुदाम दास

६. प्रकाश मागणे

७. चंद्रकांत रकत

८. नागेश नामदेव जगताप

९. अविनाश सुर्वसे

१०. मनीषा सुदाम दास व इतर.

हजारो नागरिक जाळ्यात?

‘सिस पे’ प्रमाणेच ‘समर्थ क्रॉप केअर’मध्येही कोट्यवधींची गुंतवणूक झाली असून हजारो नागरिक या फसवणुकीचे बळी ठरल्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातून या कंपनीचे कामकाज चालत होते. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, नागरिकांनी अशा कोणत्याही अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!