पुणे: फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उरुळी देवाची परिसरात सापळा रचून बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत राऊंड आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १० मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस हवालदार नितीन गायकवाड व सागर वनवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उरुळी देवाची येथील एका लाल रंगाच्या कारमध्ये तीन संशयास्पद तरुण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारची झडती घेतली असता आरोपींकडे शस्त्र मिळून आले.
१. शुभम चिमा गायकवाड (वय २५ वर्षे, रा. वैराग, जि. सोलापूर; सध्या रा. उरुळी देवाची).
२. गौरव हनुमंत भाडळे (वय २४ वर्षे, रा. उरुळी देवाची, ता. हवेली).
३. नागेश गोपाळ निलेवाड (वय २३ वर्षे, रा. लातूर; सध्या रा. उरुळी देवाची).
एक गावठी बनावटीचे पिस्तूल.एक जिवंत राऊंड (काडतूस).एक लाल रंगाची कार.एकूण किंमत: ₹५,४१,०००/-.
तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपी शुभम गायकवाड आणि नागेश निलेवाड यांच्यावर लातूर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी गौरव भाडळे याच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त ना. डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले
, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पवार, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे, उमेश जगताप, तसेच अंमलदार नितीन गायकवाड, सागर वनवे, श्रीनाथ जाधव, हेमंत काकडे आणि अभिजित टिकेकर यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत.









