दैवी शक्तीचा बहाणा करून महिलेवर अत्याचार; मांजरी परिसरातील धक्कादायक घटना
पुणे:
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, पुण्यातूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. दैवी शक्ती अंगात असल्याचे भासवून एका भोंदूने ३५ वर्षीय महिलेवर पुण्यात आणि वसईत अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची पुण्यातील असून ती धार्मिक प्रवृत्तीची आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख संशयित आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याशी झाली. आरोपी वैद्य हा मूळचा वसईचा रहिवासी आहे. त्याने स्वतःमध्ये ‘दैवी संचार’ असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. “ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो,” असे आमिष दाखवून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले.
आरोपी वैद्य २०२३ मध्ये पुण्यात आला आणि त्याने मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडितेला पुन्हा वसईला बोलावून घेतले आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेचे मुख्य ठिकाण पुणे असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. सध्या भोंदू ऋषिकेश वैद्य फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अंधश्रद्धेला बळी न पडता अशा भोंदू लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









