जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांचे प्रखर आव्हान
पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी सत्ताधाऱ्यांना प्रखर आव्हान दिले आहे. कोडीत येथे झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी सुरेखा ढवळे म्हणाल्या की, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असताना अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य, शिक्षण, महिलांचे तसेच दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांग नागरिकांना आवश्यक सुविधा, शासकीय योजनांचा लाभ आणि सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणावर भर देताना त्यांनी स्पष्ट केले की, महिलांप्रमाणेच दिव्यांग व्यक्तींनाही न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना सातत्याने संघर्ष करत राहील. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महिला व दिव्यांग घटकांचा प्रभावी सहभाग वाढवणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ५० दिवे–गराडे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार दिव्या ताई गंगाराम जगदाळे तसेच ९९ गराडे पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार ललिता ताई दिलीप कटके यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
या सभेला परिसरातील महिला, दिव्यांग नागरिक व इतर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेखा ढवळे यांच्या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे निवडणूक प्रचारात चांगलीच रंगत आली असून, जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक अधिकच चुरशीची होत असल्याचे चित्र आहे.










