अनिरुद्ध पावसकर यांची शहर अभियंता पदावर नियुक्ती!!!!
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी श्रेणीतील सर्वोच्च पद असलेल्या शहर अभियंता पदावर पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी काढले आहेत.
यापूर्वी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढे १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतही हा ठराव मंजूर करण्यात आला. अखेर ३० जानेवारी २०२६ रोजी आयुक्त नवलकिशोर राम यांनी अंतिम आदेश दिले.
सध्या कार्यरत शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे सेवानिवृत्त होत असल्याने या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शहर अभियंता, आयुक्त (आरोग्य), प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त ही पदे शासनमान्य असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे.
महापालिकेतील सर्व अभियांत्रिकी विभागांवर शहर अभियंत्याचे नियंत्रण असते. त्यामुळे ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप हे दोघेही या पदासाठी पात्र होते. मात्र अनुभव आणि प्रशासकीय कामगिरीच्या आधारे अनिरुद्ध पावसकर यांना पसंती देण्यात आली.









