सासवड मार्गावर अवजड वाहनांना वळवताना पुलाखालीच अडथळा; नागरिकांचा संताप
हडपसर :
हडपसर परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी लावण्यात आलेले बॅरॅकेटच आता कोंडीचे मुख्य कारण ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सासवड मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांना गाडीतळ मार्गे सोलापूरकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी पुलाखाली नेमक्या ठिकाणी बिनकामाचे बॅरॅकेट लावल्यामुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. व याच ठिकाणी पीएमपीएलवाले सुद्धा एकापाठोपाठ एक दोन चार बस लावून रस्ता अडवतात यामुळेच दिवसभर रस्त्यावर गर्दीच असते.

या अडथळ्यामुळे चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागते. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होत असून नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी काही कर्मचारी पावत्या करण्यातच अधिक व्यस्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अवजड वाहतूक बंद असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मोठी वाहने त्या मार्गावरून कशी येतात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाहणी करून अनावश्यक बॅरॅकेट हटवावेत व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.









