कॉन्ट्रॅक्ट बेसवरील ई-बस, अनफिट ड्रायव्हर व बेजबाबदार कंडक्टरमुळे 24 वर्षीय ऋतुजा मानेचा भीषण अपघात
पुणे | प्रतिनिधी
भेकराई नगर डेपोतील कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेल्या ई-बसच्या निष्काळजीपणामुळे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एम.एच. 12 एस.एफ. 0021 क्रमांकाच्या ई-बसने आय.बी.एम .समोर बसमधून उतरून कडेला चालत असलेल्या 24 वर्षीय ऋतुजा माने हिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऋतुजाचे दोन्ही पाय बसच्या चाकाखाली चिरडले गेले असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
अपघातग्रस्त ऋतुजा माने ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. आई-वडील, एक भाऊ व एक बहीण यांच्या संपूर्ण जबाबदारीचा भार तिच्यावर होता. एका क्षणात झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत ऋतुजाला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
संतापजनक बाब म्हणजे, इतक्या गंभीर घटनेनंतरही पीएमपी
एल प्रशासन, ई-बस कंत्राटदार कंपनी तसेच भेकराई डेपोचा एकही जबाबदार अधिकारी हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी अथवा सहानुभूती व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेला नाही.
स्थानिक नागरिकांनी भेकराई नगर डेपोतील कॉन्ट्रॅक्ट ई-बस व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. अनेक ई-बसेसची पत्रे तुटलेली, बाहेर आलेली असून दोरीने बांधून बस चालवल्या जात आहेत. तसेच, कंत्राटी चालकांकडे आवश्यक ट्रेनिंग व सेफ्टी सर्टिफिकेट नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. अपुऱ्या प्रशिक्षणामुळे आणि निष्काळजी पणामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.









