पी.एम.पी.एल.मध्ये ‘पैसे द्या, प्रमोशन घ्या’चा आरोप; ड्रायव्हर-कंडक्टर पदोन्नती प्रकरणात नवे खुलासे
पुणे :
पी.एम.पी.एल. (PMPL) मध्ये ड्रायव्हर व कंडक्टर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी पैसे मागितल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. तक्रारीनुसार, पदोन्नतीसाठी अडीच लाख रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणात ज्ञानेश्वर जाधव यांचे नाव पुढे आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सदर रक्कम कॅश चव्हाण या व्यक्तीकडून देण्यात आल्याचा आरोप असून, या व्यवहारात ‘स्टार्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मध्यस्थाची भूमिका असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मध्यस्थामार्फतच सदर रक्कम ज्ञानेश्वर जाधव यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
या कथित व्यवहारामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग किंवा आश्रय असल्याशिवाय एवढा मोठा आर्थिक व्यवहार शक्य नाही, असा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पी.एम.पी.एल. प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटना व कर्मचारी वर्गातून होत आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.









