पुणेशहरात केमिकलयुक्त फळे, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच दुधापासून तयार होणाऱ्या बनावट व भेसळयुक्त पदार्थांचा सुळसुळाट वाढत असल्याचा गंभीर आरोप करत दोषींवर कडक कारवाई करून ‘मोक्का’ (MCOCA) लावण्याची मागणी क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील काही हॉटेल, ज्यूस सेंटर, फळविक्रेते तसेच दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यावसायिक फळे लवकर पिकवण्यासाठी तसेच आकर्षक दिसण्यासाठी धोकादायक रासायनिक पदार्थांचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच दुधापासून तयार होणारे पनीर, खवा, दही, तूप, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कॅन्सरसारखे घातक आजार होण्याचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अमोल नाना तुपे यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी FSSAI परवाना नसतानाही अन्नपदार्थांची विक्री सुरू आहे, तसेच साठवणूक व उत्पादन प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने शहरभर विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावून कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर क्रांती शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.









