जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण!!!!
युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम व आनंदवन फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे, दि. ५ जून : “पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज” हा संदेश देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम आणि आनंदवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज-५ (औतडवाडी-हांडेवाडी) तसेच न्याती काउंटी येथे तब्बल ७०० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या संकटांविषयी जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर आशिष ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “झपाट्याने होणारे शहरीकरण, वृक्षतोड आणि वाढते जागतिक तापमान या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढणे ही काळाची गरज आहे.”
सध्या जगभरात भेडसावत असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग, वाढता उष्णतेचा कडाका, पर्जन्यमानातील अनियमितता आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधींचा ऱ्हास या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी सांगितले की, “या मोहिमेत केवळ वृक्षारोपण करून थांबणार नाही, तर पुढील तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि देखभाल करण्याची जबाबदारी संस्था घेणार आहे.”
यावेळी आनंदवन संस्थेचे विशाल पवार यांनी आनंदवन फेज-१ ते फेज-७ पर्यंतच्या विकासाचा आढावा घेत संस्थेच्या विविध सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांची माहिती दिली. तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी सांगितले की, संस्था गेल्या तीन वर्षांपासून कळसुबाईच्या पायथ्याशी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य करत असून, त्याच मोहिमेचा विस्तार म्हणून यंदा आनंदवन फेज-५ येथे हा उपक्रम राबविण्यात आला. “जागतिक पर्यावरण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून समाजहितासाठी चालणारी लोकचळवळ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी आनंदवन संस्थेचे प्रवीणकुमार आनंद, रमेश नऱ्यानी, भूपेश शर्मा तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ. समीर ननावरे, डॉ. पुस्तके, डॉ. पाटील, डॉ. वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. इंडियन डायस्पोराचे रजत कुमार आणि झेंटिव्हाचे श्री. पुरोहित यांच्यासह दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डी.पी.एस. स्कूल आणि ग्रेस स्कूल येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले.
याशिवाय नोबेल हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी डॉ. संजय पठारे, हेल्थ केअर असोसिएशनचे धनंजय कणसे, सिद्धू चव्हाण, हृषीकेश शेळके, डॉ. भूषण केदारी, श्री. अडसूळ, संघर्ष अकॅडमी (उरळी कांचन) तसेच विविध वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि शेकडो निसर्गप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या भव्य वृक्षारोपण मोहिमेमुळे परिसरात हरितक्रांतीची नवी आशा निर्माण झाली असून, भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.








