:
हडपसर परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या आसपास रोडरोमिओ, सुसाट वेगाने धावणाऱ्या बुलेट गाड्या तसेच मोठ्या आवाजात सायलेन्सर बदललेल्या दुचाकीमुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अमोल (नाना) यशवंत तुपे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री, पुणे शहर पोलीस आयुक्त तसेच हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. हडपसर-माळवाडी परिसरात रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय, द.बा. तुपे कन्या विद्यालय, साने गुरुजी विद्या मंदिर, एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर कर्ण बधिर स्कूल, अकुताई विद्यालय आदी शाळा-महाविद्यालये आहेत. या परिसरात दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात.
निवेदनात म्हटले आहे की, काही तरुण बुलेट आणि इतर दुचाकींचे सायलेन्सर बदलून मोठा आवाज करत सुसाट वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच रोडरोमिओ विद्यार्थिनींना त्रास देत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
याशिवाय या परिसरात साने गुरुजी आरोग्य केंद्र असल्याने गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र दुचाकींच्या मोठ्या आवाजामुळे व वेगामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत पोलिस बंदोबस्त वाढवावा, वाहतूक नियंत्रण करावे, सायलेन्सर बदललेल्या गाड्यांवर कडक कारवाई करावी तसेच नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करून गाड्या जप्त कराव्यात, अशी मागणी अमोल तुपे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
हडपसर परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.अमोल नाना तुपे
त्यांनी दिला आहे.









