हडपसर
:
पुणे शहरातील नगर रचना विभागाने तयार केलेल्या नवीन डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) संदर्भात शेतकरी व सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक व अध्यक्ष अमोल (नाना) यशवंत तुपे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही डीपी प्लॅन तयार करण्यात आला होता; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आता पुन्हा नव्याने डीपी प्लॅन तयार करण्यात आला असून त्यातून बिल्डर लॉबी व उद्योगपती यांना अधिक फायदा होईल, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्तांवर आरक्षण टाकून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच या आरक्षणामुळे अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर आणि जमिनीवर परिणाम होत असून त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने डीपी प्लॅन तयार करताना शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मतांचा विचार केलेला नसल्याचेही तुपे यांनी निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय काही ठिकाणी बिल्डर व उद्योगपतींच्या फायद्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करत याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका औषध कंपनीसमोर असलेल्या रस्त्याची रुंदी १८ मीटरवरून १५ मीटर करण्यात आल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच डीपी प्लॅनमध्ये पारदर्शकता ठेवून नागरिकांचा विश्वास जपावा, असेही अमोल तुपे यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे









