🔴 
पुणे (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव यांची काही माध्यमांतून आणि सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आर.पी.आय. पुणे शहरप्रमुख संजय सोनवणे यांनी केला आहे. ही बदनामी पूर्णपणे राजकीय द्वेषातून आणि षडयंत्रपूर्वक करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय सोनवणे यांनी सांगितले की, आगामी राजकीय घडामोडी लक्षात घेता काही विरोधकांकडून बालासाहेब जानराव यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना खोटे आरोप करून समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब जानराव हे आर.पी.आय.चे निष्ठावान व तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेते असून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे काही राजकीय शक्तींना अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आर.पी.आय. पक्ष बाळासाहेब जानराव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शहरप्रमुख संजय सोनवणे यांनी दिला आहे. तसेच जनतेने अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.









