ई-बस अपघातांवर प्रशासन बेजबाबदार; भेकराई डेपो मॅनेजरचे अजब विधान, एक्सीडेंट विभागावर खोट्या दाव्यांचे आरोप!!!


“अपघात झाला तर  आमची जबाबदारी नाही” — भेकराई डेपो मॅनेजर विवेक  हारजित चे बेताल वक्तव्य; ई-बस अपघातानंतर एक्सीडेंट विभागही अंग झटकत असल्याचे आरोप !!!!!!

हडपसर

:

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एल) अंतर्गत भेकराई नगर डेपो आणि ई-बस अपघात प्रकरणात प्रशासनाची गंभीर असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे. भेकराई नगर डेपो मॅनेजर यांनी केलेले बेजबाबदार विधान आणि ई-बस एक्सीडेंट विभागाच्या अधिकाऱ्यांवर खोट्या माहितीचे आरोप यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, भेकराई नगर डेपोचे व्यवस्थापक म्हणाले असल्याचा आरोप आहे की,

“मला इथे बसवले आहे ते फक्त इन्कम वाढवण्यासाठी. लोकांचे काही कमी-जास्त झाले, अपघात झाले तरी मी जबाबदार नाही. त्याची चौकशी स्वारगेटला करा.”

या अजब आणि बेताल वक्तव्यामुळे प्रवासी सुरक्षेबाबत प्रशासन किती बेफिकीर आहे, हे स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

डेपोमधून धावणाऱ्या अनेक बसेस अनफिट अवस्थेत, तुटलेली पत्रे, खराब बॉडी आणि असुरक्षित रचनेमुळे प्रवासी जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. काही घटनांमध्ये अपघात गंभीर स्वरूपाचे ठरले असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दरम्यान, ई-बस अपघात प्रकरणात एक्सीडेंट विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अपघातानंतर अधिकाऱ्यांकडून “जखमीला हॉस्पिटलमध्ये भेट देण्यात आली” असे सांगितले जात असले, तरी जखमी मुलीच्या कुटुंबीयांनी हा दावा साफ खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

जखमी मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की,

“आजपर्यंत एकही अधिकारी आम्हाला भेटायला आलेला नाही. कसलीही आर्थिक किंवा वैद्यकीय मदत मिळालेली नाही.”

असे असतानाही अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पी.एम.पी.एल मधील प्रवासी सुरक्षा, अपघातानंतरची मदत प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “जर अपघात, जखमी किंवा मृत्यूची जबाबदारी कोणीच घेणार नसेल, तर प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या सर्व प्रकरणांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भेकराई नगर डेपोतील आणि ई-बस सेवेमधील सर्व बसेसची तांत्रिक तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, प्रवासी आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, या गंभीर आरोपांवर पी.एम.पी.एल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!