हडपसर येथील घुले वस्ती ते गोडबोली वस्तीत नागरी समस्यांचा डोंगर; पावसाळ्यात भुयारी पूल ठरतोय डोकेदुखी…तर रस्त्यांची चाळण..
पुणे (हडपसर):
हडपसर परिसरातील घुले वस्ती ते गोडबोली वस्ती येथील नागरिक सध्या विविध मूलभूत आणि गंभीर नागरी समस्यांचा सामना करत आहेत. परिसरातील रस्त्यांची दरावस्था आणि रेल्वेच्या भुयारी पुलाची (अंडरपास) अपुरी उंची यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यात पुलाखाली गुडघाभर पाणी; टू-व्हीलरही होतात बंद
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांत येथील रेल्वे भुयारी पुलाखाली थेट गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी साचते. पाणी साचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद पडतो. अनेकदा दुचाकी वाहने या पाण्यात बंद पडतात, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. “या पुलाची उंची आणि रुंदी वाढवून त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, जेणेकरून दोन गाड्या एकाच वेळी सहज जाऊ शकतील,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वर्षानुवर्षे रस्ता कच्चाच; डांबरीकरणाची प्रतीक्षा
घुले वस्ती ते गोडबोली वस्तीमधील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. नागरिकांनी सांगितले की, आम्ही जेव्हापासून येथे राहायला आलो आहोत, तेव्हापासून हा रस्ता कच्चाच आहे. काही भागापुरते सिमेंट काँक्रीटचे काम झाले असले, तरी पुढील संपूर्ण रस्ता खड्डेमय आणि कच्चा आहे. या रस्त्यावरून टँकर आणि मोठ्या वाहनांची सतत वाहतूक सुरू असते, ज्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे.
समस्या सोडवण्यासाठी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष:’अमोलनाना तुपे’ यांच्याकडून विशेष पाठपुरावा..
या भागात स्थानिक नगरसेवक असले, तरी येथील समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक नेते क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष:अमोलनाना तुपे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अमोलनाना तुपे यांच्या या पुढाकारामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे गोडबोली वस्तीमधील हे रेंगाळलेले प्रश्न लवकरच सुटतील, अशी आशा आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.








