मांजरी:तंबाखूच्या विषारी घटकांपासून भावी पिढीला वाचवा; शैलेंद्र बेल्हेकरांचे शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधनाचे आवाहन!


तंबाखूसेवन म्हणजे कर्करोगाला निमंत्रण; स्वतःसोबत कुटुंबाचेही जीवन उद्ध्वस्त करू नका: शैलेंद्र बेल्हेकर

मांजरी (पुणे):

“तंबाखूचे सेवन करणे म्हणजे कर्करोगासारख्या (कॅन्सर) जीवघेण्या आजाराला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे. या एका व्यसनामुळे माणसाचे स्वतःचे आरोग्य तर धोक्यात येतेच, शिवाय त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होते. त्यामुळे भावी पिढीला या घातक व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून व्यापक प्रबोधन करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले.

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून ‘अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था’ आणि ‘श्री स्वामी समर्थ मंदिर, मांजरी बुद्रुक’ यांच्या वतीने मांजरी परिसरात भव्य ‘व्यसनमुक्ती जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बेल्हेकर बोलत होते.

भापकर मळा परिसरात जनजागृती फेरी

या अभियानांतर्गत परिसरातील ‘भापकर मळा’ येथे विशेष जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत तब्बल हजारो भाविक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

पुढील मार्गदर्शन करताना शैलेंद्र बेल्हेकर म्हणाले की, तंबाखूमध्ये अनेक विषारी घटक असतात. या घटकांमुळे मुखाचा कर्करोग (तोंडाचा कॅन्सर), हृदयविकार, श्वसनाचे गंभीर विकार जडतात, तसेच मेंदूवरही याचा घातक दुष्परिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो. हे टाळण्यासाठी तरुणांमध्ये वेळीच जनजागृती होणे काळाची गरज आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ मंदिराचे संस्थापक विठ्ठल भापकर, भाऊसाहेब मुरकुटे, शंकर घुले, रमेश घुले आणि निलेश भाले यांसह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि यशस्वी संयोजन ओजस बेल्हेकर, बाप्पुसाहेब टकले व संपत भापकर यांनी केले. अभियानामुळे मांजरी परिसरातील नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश गेल्याचे संयोजकांनीसांगितले. अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने तंबाखू सेवन विरोधी दिन जनजागृती करण्यात आली.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!