पुणे (हवेली) – कदमवाक वस्ती येथील वार्ड क्रमांक २ व ६ मधील नागरिकांना १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे तसेच घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.
नुकसान भरपाई मिळावी यासाठी नागरिकांनी शासनाकडे अर्ज केले होते. मात्र, तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे अर्ज वेळेत पूर्ण करून सादर करण्यात आले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
या संदर्भात मा. उपसरपंच सौ. राजश्री उदय काळभोर यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय, लोणी काळभोर समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात नुकसानग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शासनाकडून मदत जाहीर होऊनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता आमरण उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा निर्धार मा . उपसरपंच राजश्री उदय काळभोर त्यांनी केला आहे.










