हडपसर (पुणे):
पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकासकामांचे दावे कितीही केले जात असले, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत मात्र आनंदीआनंदच आहे. निवडणुका येतात आणि जातात, नेते मोठी आश्वासने देतात, पण हडपसरमधील हजारो नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एक सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा विचार एकाही लोकप्रतिनिधीला आजवर शिवलेला नाही, अशी संतापजनक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
बस थांबे गर्दीने ओसंडून, पण सुविधेचा पत्ता नाही
रवी दर्शनपासून ते महापालिकेच्या हद्दीतील शेवटच्या टोकापर्यंत अनेक महत्त्वाचे एस.टी. थांबे आणि पीएमपीएल बस थांबे येतात. या ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश असतो. मात्र, या संपूर्ण पट्ट्यात पुरुष आणि महिलांसाठी साधे सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुतारी उपलब्ध नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाचा रोख फक्त गरिबांवर …
?
एकीकडे प्रशासन शहराच्या सौंदर्यीकरणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे रस्त्यावर बसून पोट भरणार्या हातागाडी चालकांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर तत्परतेने कारवाई करते. मात्र, त्याच रस्त्यावरून चालणाऱ्या हजारो लोकांसाठी अत्यावश्यक असलेली स्वच्छतागृहांची सुविधा देण्यास पालिकेला विसर पडला आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.
नागरिकांचे प्रश्न:….?
हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी साधे स्वच्छतागृह का नसावे?
निवडणुकीच्या काळात मते मागायला येणाऱ्या नेत्यांना जनतेच्या या मूलभूत अडचणी का दिसत नाहीत?
स्मार्ट सिटीच्या गप्पा मारताना ‘स्वच्छ भारत अभियाना’चा हडपसरमध्ये विसर पडला आहे का?एकीकडे पथारी व्यावसायिकांकडून भाडे वसूल केले जाते, मात्र दुसरीकडे त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज, सुरक्षा आणि बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने पथारी व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन ठिकठिकाणी फिरती स्वच्छतागृहे किंवा कायमस्वरूपी मुतारीची व्यवस्था करावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.









