पुणे : ससाणे
नगर परिसरात सुरू असलेल्या श्रीराम जन्मोत्सव कर्णकर्कश साऊंड मिरवणुकीने अखेर एका निष्पाप महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लेन नं. १२ मधील जाधव आडनावाच्या महिलेचा प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत प्रचंड आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ९० डेसिबल पेक्षा जास्त आवाजास मनाई असताना देखील उघडपणे नियमांचे उल्लंघन करण्यात आले. संबंधित महिला साऊंड पाहण्यासाठी चौकात गेल्या असता अचानक आवाजाची तीव्रता असह्य झाली. त्यांना तीव्र त्रास जाणवू लागला आणि काही क्षणांतच त्यांना जबरदस्त हृदयविकाराचा झटका आला. त्या जागीच कोसळल्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृत महिलेचे सुपुत्र सौरभ जाधव यांनी दिली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ससाणे नगर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांच्या निष्क्रियते वर तीव्र टीका केली आहे. “नियम आहेत, पण अंमलबजावणी कुठे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
९० डेसिबलची मर्यादा असताना एवढा प्रचंड आवाज कोणाच्या परवानगीने?
पोलिस यंत्रणा आणि प्रशासन नेमके काय करत होते?
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर आणि परवानगी देणाऱ्या वर गुन्हा दाखल होणार का?
साऊंड मिरवणुकांवर नियंत्रण आणण्यास पोलीस प्रशासन अपयशी का?
या घटनेनंतर संबंधित मिरवणूक आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा (IPC 304) दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच अशा कर्णकर्कश साऊंड मिरवणुकांवर तातडीने बंदी घालावी, अन्यथा भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ससाणे नगर मधील ही घटना प्रशासनासाठी मोठा धक्का असून आता तरी कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









