पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील मांजरी केशवनगर आणि साडेसतरानळी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे.
हडपसर:
साडेसतरानळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेली सुमारे पाच एकर एरिकेशन विभागाची जागा अतिक्रमण होण्यापूर्वी मनपा प्रशासनाने ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी जनकल्याणकारी प्रकल्प उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या जागेवर अत्याधुनिक सरकारी रुग्णालय, ई-लर्निंग इंग्लिश माध्यम शाळा, क्रीडा संकुल, प्रशासनिक भवन, विठ्ठल-रुक्माई मंदिर तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारी आणि कोयता गँगच्या दहशतीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारणेही अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
याशिवाय सर्वे नंबर २०६ गोसावी येथील ग्रामस्थ सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर कर भरले असून त्यांच्या घरांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर गायरान जमीन गावठाणासाठी राखीव घोषित करून प्रत्येक घरधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळू शकेल.
तसेच साडेसतरानळीतील दांगट वस्तीतील रहिवाशांचेही नाव प्रॉपर्टी कार्डावर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व जनकल्याणकारी प्रकल्पांसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष अमोल नाना तुपे, ह. भ. प. बापू महाराज तुपे, ह. भ. प. शंकर महाराज बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते शुभम उर्फ मोनू कांतीलाल गायकवाड आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आता या महत्त्वाच्या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते, याकडे साडेसतरानळी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









