इतिहास आणि तंत्रज्ञानाचा संगम: प्रज्ञा संकुलात ‘शिवरायांचा प्रताप’ आणि ‘रोबोटिक्सची झेप’!
फुरसुंगी: एकीकडे हातात भगवा ध्वज घेऊन ढोल-ताशांच्या तालावर नाचणारी लेझीम पथके आणि दुसरीकडे भविष्यातील तंत्रज्ञानाचे द्वार उघडणारी ‘रोबोटिक्स लॅब’…
हे अनोखे दृश्य नुकतेच फुरसुंगी येथील प्रज्ञा विद्यालयात पाहायला मिळाले. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे!
कार्यक्रमाची सुरुवात होताच अवघे विद्यालय ‘शिवमय’ झाले होते. बालवाडी च्या, चिमुकल्यां पासून ते नववी च्या किशोरवयीन मुलांपर्यंत प्रत्येकाच्या मुखात शिवरायांचा गौरव होता.
जणू काही रायगडावरून शाहीर बोलत आहेत, अशा आवेशात विद्यार्थ्यांनी पोवाडे आणि शिवगीते सादर केली.
इयत्ता आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा ‘लाठीकाठी’ची प्रात्यक्षिके सुरू केली, तेव्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. शिस्त, वेग आणि अचूकता यांचा अद्भुत नमुना तिथे पाहायला मिळाला. इयत्ता तिसरीच्या चिमुकल्यांनी आपल्या लेझीमच्या तालावर सर्वांनाच ठेका धरायला लावला.
शिवरायांनी नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा (उदा. आरमार, किल्ले बांधणी) स्वीकार केला. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळेने ‘एरिक्सन’ (Ericsson) च्या सहकार्याने आणि ‘वोडाफोन आयडिया फाउंडेशन’ व ‘मोईनी फाउंडेशन’ चे श्री.नितीन राठोड व श्री.गिरीश माने यांच्या माध्यमातून भव्य रोबोटिक्स लॅबचे लोकार्पण केले. यावेळी रोबोटिक व थ्रीडी प्रिंटर चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
आमचे विद्यार्थी केवळ इतिहास वाचणार नाहीत, तर या लॅबच्या माध्यमातून नवीन इतिहास घडवतील,” असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिकांनी यावेळी व्यक्त केला.
नगरसेविका श्रीमती उषाताई ढोरे यांच्या हस्ते फित कापून लॅबचे उद्घाटन करण्यात आले. नवचैतन्य मित्र मंडळाचे पदाधिकारी श्री. संगम गायकवाड सर व श्रीमती राजश्री कांबळे ताई यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
या ऐतिहासिक सोहळ्याचे सारथ्य (सूत्रसंचालन) श्री. राहुल तोरडमल सर व सौ. शेख मॅडम यांनी अत्यंत खुबीने केले, तर श्री. संतोष हिंगणे सर यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
प्रज्ञा शिशू विहार च्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली नाईक प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ससाणे रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.कविता बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.









