*आत्महत्या की राजकीय कट? व्हायरल ऑडिओमुळे गंभीर संशय; प्रभाग ४१ मधील NCP उमेदवार फारूक इनामदारांना न्यायालयाकडून दिलासा*
पुणे : हडपसर सय्यद नगर, प्रभाग ४१ मधील रहिवासी सादिक कपूर यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार फारूक इनामदार यांच्याविरोधात लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८, ३०८(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा एक कथित व्हायरल ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषणाच्या आधारे ही घटना आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर संशय पत्रकार परिषदेत फारुख इनामदार यांनी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आत्महत्या की राजकीय कट, असा प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण घटनेला वेगळे वळण लागले आहे.
या प्रकरणामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना उमेदवार फारूक इनामदार यांनी थेट आरोप करत सांगितले की, “निवडणुकीच्या काळात माझे राजकीय आयुष्य जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. *यामागे काँग्रेसचे प्रशांत जगताप असल्याचा मला ठाम संशय आहे.” असा गंभीर आरोप फारुख इनामदार त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात माननीय जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी लष्कर पोलीस स्टेशन पोलिसांना फारूक इनामदार यांना अटक न करण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे इनामदार यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यावरील तातडीची अटकेची कारवाई टळली आहे.
न्यायालयीन आदेशानंतर फारूक इनामदार यांचा निवडणूक प्रचाराचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. दुसरीकडे, व्हायरल ऑडिओ, घातपाताचा संशय आणि राजकीय आरोपांमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. तोपर्यंत कोणतेही ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे..









