दोषारोपपत्रात विलंब; कुख्यात टिपू पठाण टोळीतील ६ जणांना न्यायालयाकडून जामीन
शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गँगस्टर रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण याच्या टोळीविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल न केल्यामुळे न्यायालयाने सहा आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तपास यंत्रणेकडून निर्धारित कालावधीत दोषारोपपत्र सादर न झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणात इजाज सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, अजीम ऊर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद आणि तन्वीर शकील शेख यांच्यासह एकूण ६ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने आपल्या आदेशात या निकालाची प्रत माहितीसाठी आणि आवश्यक त्या कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दोषारोपपत्र दाखल करण्यात झालेल्या विलंबाबाबत जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई
होणार का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.









