
k
मांजरी घुले वस्ती पासून ते गोपाळ पट्टी परिसरात रस्त्यावर दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून भाजीवाले, टेम्पोवाले तसेच गॅरेज चालकांनी रस्त्यांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत.
या परिसरात मोठ्या आवाजातील भोंग्यांचा वापर होत असल्याने वाहतूक अधिकच विस्कळीत होत आहे. अतिक्रमण विभागाकडून हफ्ता वसूल केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून वाहतूक विभाग देखील या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण प्रकरणावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केली आहे. जर संबंधित अतिक्रमण हटवले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही, तर पालिका व वाहतूक विभागाला कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.









